संघटना का वाढत नाही…? आरशात पाहण्याची वेळ आली आहे!
nilesh thakre
मुख्य संपादक
संघटना म्हणजे केवळ नाव, बॅनर, पदे आणि बैठका नव्हेत. संघटना म्हणजे विचार, कृती, त्याग, शिस्त आणि सामूहिक ध्येयासाठी झटणारी माणसं. पण आज आपण प्रामाणिकपणे स्वतःला विचारलं तर उत्तर अस्वस्थ करणारं आहे – आपल्या संघटना वाढत का नाहीत?
कारण बाहेर शत्रू नाही, अडथळे आत आहेत. प्रश्न व्यवस्थेचा नाही, प्रश्न मानसिकतेचा आहे.
प्रत्येकाने स्वतःला या २५ मुद्द्यांच्या आरशात पाहण्याची वेळ आली आहे.
१) अभ्यासाशिवाय मतप्रदर्शन – विचारांचा दिवाळखोरी.
तोकडा अभ्यास, सखोल माहिती नसताना मोठमोठी विधानं करणं ही आजची फॅशन झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट टाकणं सोपं आहे, पण जमिनीवर काम करणं कठीण आहे. वस्तुस्थिती समजून न घेता भावनिक भूमिका घेतली जाते. संघटनेला विचारवंत हवे असतात, केवळ वक्ते नाही.
२) काम कमी, मिरवणं जास्त.
काही जणांना संघटना म्हणजे प्रसिद्धीचं साधन वाटतं. प्रत्येक कार्यक्रमात फोटो, प्रत्येक बैठकीत भाषण, पण काम मात्र शून्य! अशा दिखावूपणामुळे कार्यकर्त्यांचा विश्वास उडतो. संघटनेची ताकद कामात असते, कॅमेऱ्यात नाही.
३) श्रेय न देणारी मानसिकता.
चळवळीची तळमळ दाखवणं सोपं, पण सहकाऱ्यांना श्रेय देणं कठीण! दुसऱ्याचं कौतुक केलं तर आपली उंची कमी होईल, अशी भीती काहींच्या मनात असते. ही भीती संघटनेचं नुकसान करते. श्रेय वाटलं की संघटना वाढते.
४) सर्वसमावेशकतेचा अभाव.
अभ्यासू आणि सक्षम व्यक्ती आपल्यापुढे जाईल या भीतीने त्याला बाजूला ठेवणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारणं आहे. संघटना मोठी होते ती विविध मतं, विविध क्षमतांमुळे. गटबाजीमुळे नाही.
५) नेतृत्वाची खुर्ची कायम ठेवण्याची हाव.
दीर्घकाळ आपणच नेता राहावं म्हणून गटबाजी करणं ही संघटनेची सर्वात मोठी शोकांतिका आहे. नेतृत्व म्हणजे जबाबदारी, वारसा निर्माण करणं. पण इथे नेतृत्व म्हणजे खुर्ची, पद, सत्तेचा मोह.
६) वैयक्तिक स्वार्थाला प्राधान्य.
संघटनेचा वापर वैयक्तिक कामासाठी करणं ही मोठी चूक आहे. संघटना म्हणजे सामूहिक ध्येयासाठी असते, वैयक्तिक सोयीसाठी नव्हे.
७) लोकशाहीचा अभाव.
निवडणुका न घेता पदावर टिकून राहणं, दादागिरी करणं – ही प्रवृत्ती संघटनेला आतून पोखरते. लोकशाही पद्धतीने निवड झालं की उत्तरदायित्व येतं. अन्यथा भीती आणि असंतोष वाढतो.
८) स्वप्नाळूपणा आणि वास्तवापासून दुरावा.
मोठमोठी ध्येयं जाहीर केली जातात, पण जमिनीवर पावलं पडत नाहीत. सहजशक्य कामं टाळली जातात, आणि अशक्य ध्येयांच्या नावाखाली कार्यकर्त्यांची दिशाभूल केली जाते.
९) माईक हातात घेण्याची स्पर्धा.
- जाईल तिथे माईक हातात घेऊन बोलणं म्हणजे नेतृत्व नव्हे. नेतृत्व म्हणजे ऐकणं, समजून घेणं, योग्य निर्णय घेणं.
१०) मान-अपमानाच्या भोवऱ्यात अडकलेले.
लग्नसमारंभ असो वा दुःखद प्रसंग, काही जण संधी शोधतात. हे राजकारण नाही, ही संवेदनाहीनता आहे. अशा वर्तनामुळे समाज दुरावतो.
११) जबाबदारीपासून पळणं.
मोठेपणाची हाव असते, पण जबाबदारी स्वीकारायला कोणी पुढे येत नाही. काम करायला नको, पण नाव हवं – ही मानसिकता संघटनेला पुढे जाऊ देत नाही.
१२) सुसंवादाचा अभाव.
“मीच नेता, बाकी कार्यकर्ते” हा अहंकार संघटनेला खिळखिळं करतो. संवाद नसला की गैरसमज वाढतात. संवाद असेल तर मतभेद सुद्धा मार्ग काढतात.
१३) प्रसिद्धीची अती हाव.
प्रत्येक गोष्टीत प्रसिद्धी शोधणं म्हणजे कामाचा आत्मा मारणं. कामासाठी प्रसिद्धी हवी, प्रसिद्धीसाठी काम नव्हे.
१४) कामशूर कमी, बातशूर जास्त.
बोलणारे खूप, करणारे कमी – ही स्थिती बदलली नाही तर संघटना कधीच मजबूत होणार नाही.
१५) बोलणं आणि वागणं यात फरक
आदर्शवाद भाषणात असतो, पण कृतीत दिसत नाही. ही तफावत कार्यकर्त्यांचा विश्वास कमी करते.
१६) टीकाकारांची गर्दी.
काम करणाऱ्यावर टीका करणं सोपं आहे. पण जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही. संघटनेला टीकाकार नव्हे, कृतीकार हवे आहेत.
१७) कम्फर्ट झोनमधील कार्य.
स्वतःचं दैनंदिन रुटीन न बिघडवता बदल हवा असतो. संघर्षाशिवाय परिवर्तन होत नाही. त्यागाशिवाय संघटना वाढत नाही.
१८) विरोधकांना शत्रू समजणं.
मतभेद म्हणजे वैर नव्हे. पण स्वतःला विरोध करणाऱ्याला संघटनेचा शत्रू ठरवणं ही मोठी चूक आहे. मतभेदातूनच चांगले निर्णय जन्म घेतात.
१९) एकमेकांच्या गुणांचा अपमान.
चांगल्या कामाची दखल न घेणं, गुणांचा सन्मान न करणं – ही संघटनात्मक संस्कृतीला घातक बाब आहे.
२०) नेतृत्वाचा आदर न करणे.
नेतृत्वावर सतत दोष काढणं आणि स्वतः पुढे न येणं – हा दुहेरीपणा संघटनेला कमकुवत करतो.
२१) त्यागाची अपेक्षा, स्वतः सुरक्षित.
दुसऱ्याने त्याग करावा, स्वतः मात्र सुरक्षित राहावं – ही वृत्ती संघटनेला अपयशी बनवते. नेतृत्व म्हणजे स्वतः पुढे उभं राहणं.
२२) समाज पुढे येत नाही, कारण आपण पुढे जात नाही.
आपण स्वतः बदलायला तयार नसताना समाजाकडून अपेक्षा ठेवणं म्हणजे आत्मवंचना आहे. संघटना वाढत नाही, कारण आपण प्रामाणिक आत्मपरीक्षण करत नाही.
उपाय काय?
संघटना वाढवायची असेल तर:
1) अभ्यासू आणि प्रामाणिक नेतृत्व निर्माण करा.
2) लोकशाही पद्धतीने निवडणुका घ्या.
3) काम करणाऱ्यांचा सन्मान करा.
4) प्रसिद्धीपेक्षा परिणामावर लक्ष द्या.
मतभेदांना स्थान द्या.
5) त्याग, शिस्त आणि पारदर्शकता या मूल्यांना प्राधान्य द्या.
6) संघटना ही एका व्यक्तीची मालमत्ता नसते. ती सामूहिक विश्वासावर उभी असते.
7) विश्वास तुटला की संघटना कोसळते.
8) आज गरज आहे ती आरशात पाहण्याची.
9) प्रश्न विचारण्याची – मी संघटनेला काय दिलं?
10) केवळ टीका केली, की कामही केलं?
11) नेतृत्वावर बोट ठेवलं, की स्वतः जबाबदारी घेतली?
12) संघटना वाढत नाही, कारण आपण वाढत नाही.
13) आपण बदललो, तर संघटना बदलेल.
14) आपण प्रामाणिक झालो, तर समाज प्रगत होईल.
15) ही वेळ आहे आत्मपरीक्षणाची…
आणि आत्मपरिवर्तनाची.
अन्यथा आपणच आपल्या संघटनेच्या अपयशाला जबाबदार राहू.



