Friday, April 17, 2026
Google search engine

कोरपना नगर पंचायतमध्ये विकासकामे ठप्प; प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या बदलाची मागणी.

कोरपना नगर पंचायतमध्ये विकासकामे ठप्प; प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या बदलाची मागणी.

कल्याण साेदारी तालुका प्रतीनिधी
चंद्रपूर :

कोरपना नगर पंचायतमध्ये सध्या विकासकामे ठप्प झाल्याचा गंभीर आरोप करत नागरिकांनी प्रभारी मुख्याधिकारी बदलण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. प्रभारी मुख्याधिकारी म्हणून नियुक्त असलेले श्री. निलेश रांजणकर हे कामकाजात टाळाटाळ करत असल्याने नगर पंचायतचा कारभार विस्कळीत झाला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दिनांक ०५ मार्च २०२६ रोजी आदेश असूनही त्यांनी १३ मार्च २०२६ रोजी प्रभार स्वीकारला. त्यानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेतील ठरावांच्या सत्यप्रती मागूनही आजपर्यंत देण्यात आलेल्या नाहीत. वाढीव पोल उभारणी, स्मशानभूमीत सामाजिक वनीकरण योजनेअंतर्गत वृक्षारोपण, विविध विकास प्रस्ताव तयार करणे तसेच नागरिकांच्या वैयक्तिक कामांबाबतही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही.

तसेच, महावितरण (MSEB) कार्यालयातून आलेल्या पत्रव्यवहारावरही अद्याप कोणताही अहवाल सादर करण्यात आलेला नाही. विविध प्रस्तावांवर सही करण्यासही टाळाटाळ होत असल्याने अनेक कामे प्रलंबित राहिली आहेत. विशेषतः घनकचरा व्यवस्थापनाच्या बिलाची फाईल मागील महिन्यापासून प्रलंबित असून, त्यावरही सह्या करण्यात आलेल्या नाहीत.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असताना त्यासाठी आवश्यक प्रस्तावही तयार करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी नगर पंचायतच्या कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागत असून त्यांना निराश होऊन परत जावे लागत आहे.

सध्या नगर पंचायतचा संपूर्ण कारभार केवळ तीन कर्मचारी व ग्राम पंचायतमधील काही कर्मचाऱ्यांवर चालत असल्याने प्रशासनावर ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बल्लारपूर येथील मुख्याधिकारी श्री. वाघ किंवा भद्रावती येथील मुख्याधिकारी श्रीमती विशाखा शेळ्खी यांची प्रभारी मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे.

या प्रकरणाकडे जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page