Friday, April 17, 2026
Google search engine

दिल्लीतील आरोळ्या, चंद्रपुरात डीजे : ईव्हीएमवरचा ढोंगी आक्रोश उघडा पडतोय.

दिल्लीतील आरोळ्या, चंद्रपुरात डीजे : ईव्हीएमवरचा ढोंगी आक्रोश उघडा पडतोय.
nilesh thakre
8668935154
राष्ट्रीय संघटक
पुराेगामी पत्रकार संघ (भारत)

महाराष्ट्रात नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकांचा निकाल लागताच काँग्रेसच्या राजकारणातील एक जुना, पण घाणेरडा पॅटर्न पुन्हा एकदा जनतेसमोर आला आहे.

दिल्लीमध्ये “वोट चोर, गद्दी छोड” म्हणत घसा फाटेपर्यंत ओरडणारे नेते, जिल्ह्यात निकाल लागताच अचानक शांत झाले.

ईव्हीएमवर रोज भाषणात कोसणारे, आज मात्र डीजेच्या तालावर थिरकताना दिसत आहेत. ही विस्मृती नाही, ही राजकीय सोयीची मौनव्रतं आहेत.

“दिल्लीतील धरणे, जिल्ह्यात जल्लोष”

चंद्रपूर जिल्ह्याच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील बड्या नेत्यांपैकी एक, ब्रह्मपुरीचे आमदार विजय वड्डेटीवार – हे दोघेही दिल्लीत आंदोलनाच्या वेळी आघाडीवर होते.

ईव्हीएमविरोधात त्यांची भाषणं, पत्रकार परिषदांतील आरोप, “मतचोरी”, “लोकशाही धोक्यात”, “संविधान वाचवा” अशा घोषणा अजूनही जनतेच्या स्मरणात ताज्या आहेत.

“वोट चोर, गद्दी छोड!”

हा नारा केवळ दिल्लीत नाही, तर महाराष्ट्रातही काँग्रेसच्या प्रत्येक सभेत घुमत होता.

मात्र प्रश्न असा आहे की –
चंद्रपूर जिल्ह्यात यश मिळताच हे सगळे नारे कुठे गेले?

ईव्हीएम वाईट… फक्त हरल्यावरच?

नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये राज्यपातळीवर काँग्रेस चौथ्या क्रमांकावर घसरली. हा वास्तवाचा धक्का आहे.

पण चंद्रपूर जिल्ह्यात काही जागा मिळाल्या, काही ठिकाणी सत्ता मिळाली – आणि अचानक ईव्हीएम “चोर” राहिली नाही.

ना खासदार धानोरकरांनी ईव्हीएमवर एक शब्द बोलला, ना आमदार वड्डेटीवारांनी लोकशाही धोक्यात असल्याचा सूर लावला. कालपर्यंत जी ईव्हीएम भाजपची एजंट होती,

तीच आज काँग्रेसच्या विजयाची साक्षीदार कशी झाली?
हा प्रश्न विचारायची हिंमत कुणाकडेच नाही.

“दिल्लीमध्ये रक्तस्त्राव, जिल्ह्यात नृत्य”

दिल्लीतील आंदोलनात काँग्रेस नेते इतक्या आवेशात होते की, जणू देशातील लोकशाही उद्याच संपणार आहे.

रस्त्यावर बसून घोषणा, संसदेला वेढा, संविधानाच्या प्रती उंचावून धरलेले फोटो – सगळं काही.

पण चंद्रपूरमध्ये काय चित्र आहे?

डीजे, फटाके, गुलाल, हारतुरे, जल्लोष! जर मतचोरी झाली असेल,
तर हा विजय कसला? आणि जर विजय मान्य असेल, तर दिल्लीतला आक्रोश कसला?

“जेव्हा नेता ओरडतो, तेव्हा कार्यकर्ता थिरकतो”

काँग्रेसमध्ये आज एक विचित्र संस्कृती रुजली आहे. नेता दिल्लीत ओरडतो –
“मत चोर, गद्दी छोड” आणि कार्यकर्ता जिल्ह्यात नाचतो –

“आम्ही जिंकलो” ही विसंगती नाही,
ही राजकीय दुटप्पीपणाची उघडी कबुली आहे. कालपर्यंत जेच ईव्हीएमविरोधी होते, तेच आज विजयाच्या व्यासपीठावर उभे आहेत.

“विजय मिळताच तत्त्वज्ञानाचा मृत्यू”

खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वड्डेटीवार हे अनुभवी नेते आहेत. त्यांना राजकारण कळतं, लोकशाही कळते, जबाबदारीही कळते.
मग प्रश्न असा आहे की – विजय मिळताच त्यांची जबाबदारी कुठे गायब झाली? ईव्हीएमविरोधात एक जरी विधान केले, तर स्वतःच्याच विजयावर प्रश्नचिन्ह उभं राहील – म्हणून मौन,
हे मौन भीतीचं आहे, सत्य लपवण्याचं आहे.

“ईव्हीएमचा मुद्दा – निवडणूक हरल्यावरच आठवण”

इतिहास साक्षीदार आहे – जेव्हा काँग्रेस हरते, तेव्हा ईव्हीएम दोषी ठरते.
जेव्हा काँग्रेस जिंकते, तेव्हा ईव्हीएमवर कुणीही बोलत नाही. हा निव्वळ योगायोग नाही, हा ठरलेला राजकीय खेळ आहे.

“जनता आता मूर्ख राहिलेली नाही”

पूर्वी जनतेला हे सगळं “राजकीय लढा” वाटायचं. आता मात्र जनता ओळखू लागली आहे – हे लढे नसून नाटकं आहेत.
लोक विचारत आहेत – “तुमचा विजय खरा, आमचा पराभव बनावट?”
“तुमच्यासाठी ईव्हीएम पवित्र, आमच्यासाठी अपवित्र?” या प्रश्नांची उत्तरं देण्याची हिंमत काँग्रेस नेत्यांकडे नाही.

“पुढील निवडणुका आणि ढोंगाचा हिशोब”

येत्या काळात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणखी निवडणुका येणार आहेत. जर काँग्रेसने हाच दुटप्पीपणा सुरू ठेवला,
तर जनता या ढोंगी राजकारणाचा हिशोब चोखपणे घेईल. कारण लोकशाही सर्कस नाही, आणि जनता टाळ्या वाजवणारी प्रेक्षक नाही.

“भूमिका ठरवा, नाच बंद करा”.

खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार विजय वड्डेटीवार आणि काँग्रेस नेतृत्वाने एक भूमिका स्पष्ट करावी –

ईव्हीएम मान्य आहे का नाही?

जर नाही, तर सर्व निवडणुकांचा बहिष्कार करा. आणि जर मान्य आहे, तर पराभवावर ईव्हीएमला दोष देणं बंद करा. दिल्लीमध्ये ओरडणं आणि
चंद्रपूरमध्ये नाचणं – हा विरोधाभास जनतेच्या डोळ्यात खुपतोय. आज नाही तर उद्या, या ढोंगी राजकारणाचा निकाल जनता नक्कीच लावेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page