Friday, April 17, 2026
Google search engine

“चौथा स्तंभ की चौथा शिकार?”

“चौथा स्तंभ की चौथा शिकार?”
पत्रकारांचा सन्मान वाचवण्यासाठी समाजानं आरसा समोर धरायला हवा!

✒️ निलेश ठाकरे – 8668935154

राष्ट्रीय संघटक पुराेगामी पत्रकार संघ (भारत)

पत्रकाराला “लोकशाहीचा चौथा स्तंभ” म्हटलं जातं — कारण तोच समाजाचं आरसाचं काम करतो.
तो सत्य दाखवतो, सत्तेला जबाबदार ठेवतो, आणि नागरिकांच्या आवाजाला लेखणीतून बळ देतो.
पण आज तोच चौथा स्तंभ सत्ताधाऱ्यांच्या आणि समाजाच्या बेफिकीरीचा चौथा शिकार होताना दिसतोय!
वर्षभर कोणत्याही भीतीशिवाय, कोणत्याही दबावाला न झुकता सत्यासाठी उभा राहणारा पत्रकार — दिवाळीच्या काळात केवळ एक जाहिरात मागतो, तेव्हा त्याच्यावर दरवाजे बंद होतात, फोन कट होतात आणि उत्तर मिळतं – “साहेब बाहेर आहेत!”
ही परिस्थिती लाजिरवाणी नाही का?
✒️ वर्षभर ‘सत्यासाठी’ लढणारा, पण दिवाळीत ‘अपमानासाठी’ तयार!
पत्रकार वर्षभर शासनातील अन्याय उघडकीस आणतो, भ्रष्टाचारावर प्रकाश टाकतो, सामान्य माणसाचा आवाज बनतो. पण दिवाळी आली की त्याच समाजाला, त्याच अधिकार्‍यांना आणि त्याच नेत्यांना हा पत्रकार अचानक नकोसा होतो!
त्याची ओळख विसरली जाते, त्याचा फोन उचलला जात नाही, आणि त्याची विनंती “मागणी” म्हणून हिणवली जाते.
जाहिरात म्हणजे केवळ पैसा नाही — ती एका लहानशा वृत्तपत्राचा श्वास असते.
त्या जाहिरातीच्या माध्यमातून एखाद्या पत्रकाराचं घर चालतं, त्याचं छापखानं जगतं, आणि त्याच्या लेखणीतून समाजाचं भान वाढतं.
पण वर्षातून एकदा मागितलेल्या जाहिरातीवरून जर पत्रकाराला अपमानित केलं जात असेल, तर ते केवळ त्या पत्रकाराचं नव्हे — तर लोकशाहीच्या आत्म्याचं दहन आहे!
पालकमंत्र्यांच्या कार्यालयातील “मौनकारभार”
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके हे पदाने मोठे असले तरी, त्यांच्या कार्यालयात घडत असलेल्या गोष्टी छोट्या नाहीत.
पालकमंत्र्यांच्या दौऱ्या संदर्भात जिल्हा माहिती कार्यालयाकडून पत्रकारांना निमंत्रणं पाठवली जातात, पत्रकार परिषदा घेतल्या जातात. म्हणजे काम झालं तर पत्रकार ‘आवश्यक’.
पण पत्रकाराने दिवाळी जाहिरातीसाठी पत्र दिलं की, त्या पत्राचं काय होतं? — केराच्या टोपलीत!
मग प्रश्न उभा राहतो —
पालकमंत्र्यांच्या कार्यालयात कर्मचारी नाहीत का, की पत्रकारांकडूनच अशी कामं करवून घेतली जातात?
आणि सगळ्यात गंभीर म्हणजे — चंद्रपूरात तर अशी चर्चा आहे की, एका पत्रकारालाच पालकमंत्र्यांच्या दिवाळी भेटीचं वितरण करण्याचं काम देण्यात आलं, आणि त्या पत्रकारानेही “तोंड पाहून” निवडक काहींनाच भेटवस्तू दिल्या!
जर हे खरं असेल, तर हा प्रकार पत्रकारितेवर काळी छाया टाकणारा आहे.
कारण पत्रकाराचा धर्म हा न्यायाचा असतो, नात्यांचा नव्हे!
चौथा स्तंभ आज काचेसारखा नाजूक झाला आहे
पत्रकारिता ही सत्ता आणि जनता यांच्यातील पूल आहे. पण आज सत्ताधारीच त्या पुलाला स्फोटक लावत आहेत.
पत्रकार परिषदांना बोलावणारे तेच अधिकारी, पण दिवाळीत जाहिरात मागितली की ‘आमचं काही अधिकार नाही’ असं म्हणतात!
लोकशाहीत ही भूमिका लाज आणणारी आहे.
“पत्रकार समाजाचा आरसा आहे” असं म्हणणारे नेते हे विसरतात की आरसा स्वच्छ ठेवण्यासाठी अधूनमधून त्याला हातभार लावावा लागतो.
तो हातभार पैशाचा असो वा सन्मानाचा — तो आदराचा संकेत असतो.
पत्रकार केवळ पैशासाठी लिहीत नाही, तो कर्तव्य म्हणून लिहितो.
पण त्याचं हे कर्तव्य निभावताना समाजानं त्याचं माणूसपण तरी ओळखावं!

सत्ताधारी आणि समाज – दोघांचं मौन घातक
आज चंद्रपूरात आणि राज्यभर अशी परिस्थिती झाली आहे की, पत्रकार जाहिरात मागतो तेव्हा राजकीय, सामाजिक, औद्योगिक सर्व मंडळींना “व्यस्त आहोत” असा आजार होतो.
पण जेव्हा त्यांच्यावर अन्याय होतो, बातमी थांबवली जाते, किंवा पोलिसांकडून न्याय मिळत नाही — तेव्हा तेच लोक पत्रकाराकडे धाव घेतात!
मग प्रश्न पडतो – पत्रकार तुमच्या संकटात सोबती, पण तुम्ही त्याच्या संकटात मौन का?
पत्रकार हा समाजाचा पहारेकरी आहे. तो कुणाचा गुलाम नाही.
त्याचं अस्त्र म्हणजे त्याची लेखणी — तीच त्याची ताकद, आणि तीच त्याची जोपासना आहे.
ही लेखणी आजही सत्यासाठी चालतेय, पण ती थकली आहे समाजाच्या मौनामुळे.
एक ज्योत, जी अंधारातही पेटलेली आहे
पत्रकार आर्थिक अडचणीत आहे, संघर्षात आहे, पण थांबलेला नाही.
कारण त्याला ठाऊक आहे — अंधार कितीही वाढला तरी उजेड लेखणीच्या टोकावर असतो.
“जाहिरात नाही दिलीत तरी आमचं कर्तव्य थांबणार नाही!”
हा पत्रकाराचा स्वाभिमान आहे, पण त्याचं हे वाक्य समाजाच्या कानांपर्यंत पोहोचत नाही.
पत्रकारांना आर्थिक मदत नाही दिली तरी चालेल — पण नैतिक पाठिंबा तरी द्या!
कारण चौथा स्तंभ पडला, तर लोकशाहीचे उरलेले तीनही स्तंभ कोसळतील.
पत्रकारांना सन्मान द्या, कारण तेच तुम्हाला सत्याचं दर्शन घडवतात.
 “सत्याच्या लेखणीला मौनाने नाही, सन्मानाने उत्तर द्या!”
पत्रकार तुमचा आरसा आहे —
त्या आरशाला तडा गेला, तर समाजाचं प्रतिबिंबही विकृत दिसेल.
म्हणूनच समाजानं, शासनानं आणि सत्ताधाऱ्यांनी हे समजून घ्यायला हवं की,
पत्रकारांचा सन्मान म्हणजे लोकशाहीचं संरक्षण आहे.
आज “चौथा स्तंभ” वाचवण्याची गरज आहे —
कारण सत्य सांगणारे आवाज जर थांबले,
तर उद्या खोटं बोलणाऱ्यांचा उत्सव साजरा केला जाईल!

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page