Friday, April 17, 2026
Google search engine

भारताची किड : गप्प बसलेला मध्यम वर्ग!

 

एक साधा चोर आपले पैसे, दागिने, वस्तू चोरतो; पण एक राजकारणी चोर आपले भविष्य, रोजगार, धंदा, आरोग्य, शिक्षण आणि अधिकार चोरतो.” यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे साधा चोर कोणाला लुटायचे हे ठरवतो, पण राजकारणी चोराला आपणच निवडून देतो, स्वतःला लुटण्यासाठी!

आज देशात लोकशाही एवढीच शिल्लक आहे की, तिचे कौतुक करण्यासाठी सरकार, राजकारणी आणि पत्रकार नेटाने काम करत आहेत. पण त्याचवेळी भारतातील मध्यम वर्ग आपल्या सुरक्षिततेच्या भ्रमात जगत आहे.

concept of Rural India

“मला काय फरक पडतो?”
“माझं काय नुकसान आहे?”
“तो चुप आहे, मग मी का बोलू?”
“माझं घर, गाडी, पगार आहे ना, मग प्रश्न कशाला विचारायचे?”

हीच मानसिकता आपल्याला विनाशाकडे नेत आहे. प्रमोशन मिळेल की नाही, पद उंचावेल की नाही, पेन्शन मिळेल ना?—या विचारांनी मध्यमवर्गीय माणूस ‘गप्प बसणे’ पसंत करतो, अन्यायाविरोधात आवाज उठवत नाही.

मध्यम वर्गाचा भ्याडपणा आणि समाजाची अधोगती

एक दिवस जर घरातील काम करणारी बाई आली नाही तर तिला हजार प्रश्न विचारले जातात, पण पावसाळ्यात गटाराचे पाणी घरात शिरले तरी सामान्य नगरसेवकाला जाब विचारायची हिंमत मध्यम वर्गात नसते.

शिक्षण, आरोग्य, रोजगार, उद्योग हे विषय महत्त्वाचे असताना धार्मिक आणि जातीय मुद्द्यांवरून भांडणारे लोकच राजकारण गाजवत असतात.

उद्योगपतींना नेहमी नफा होतो, पण शेतकरी नेहमी तोट्यात असतो, हे का?शिक्षण देणारे संस्थाचालक नफ्यात, पण शिक्षण घेणारे विद्यार्थी मात्र कर्जबाजारी का?

राजकारणी निवडून आले की त्यांची पिढ्या पिढ्या सुखात, पण सामान्य माणूस मात्र हतबल का? हे  सर्व माहीत असूनही मध्यम वर्ग मूग गिळून गप्प बसतो.

मध्यम वर्ग स्वतःच्या सुखात हरवलेला!चारचाकी गाडीवर कर्ज काढून फिरताना त्याला मंत्री चांगले वाटतात. पण..

  • पेट्रोल दर वाढतात, तरी तो गप्प! टोल नाके वाढतात, तरी तो गप्प वाहनांचा कर वाढतो, तरी तो गप्प! पण जर एका महिन्याचा कर्जहप्ता थोडा उशिरा झाला, तर बँकेचे एजंट दारात उभे राहतात.मग हजारो कोटी कर्ज घेऊन परदेशात पळून गेलेल्या उद्योगपतींना सरकार माफ का करतं?—हा प्रश्न विचारायची हिम्मत मध्यमवर्गीयांमध्ये का नाही? सरकारने मध्यमवर्गाला गुलाम केलंय, पण त्यालाच त्याची जाणीव नाही! सरकारी संपत्ती विकली जातेय, कर वाढवला जातोय, महागाई वाढवली जातेय—हे सगळं लक्षात असूनही मध्यम वर्ग ‘माझ्या पगारावर काही परिणाम नाही ना?’ याच विचारात असतो. आज ५० वर्षांचा मध्यमवर्गीय माणूस सुदृढ आहे की नाही, हे तपासले जाते, पण ८० वर्षांचा राजकारणी सत्तेत बसण्यास सक्षम आहे की नाही, हे कोणी तपासत नाही! राजकारण्यांची मुले राजकारणात, पण मध्यमवर्गीयांची मुले पुन्हा नोकरच का बनतात?हे सगळं माहित असूनही प्रश्न विचारणार कोण? राजकारण्यांचा स्वार्थ, मध्यमवर्गीयांची मूर्खपणा कालपर्यंत ज्यांना शिव्या दिल्या, तेच नेते आज दुसऱ्या पक्षात जाऊन कौतुकाने बोलतात. कारण त्यांना नैतिकतेशी काही देणे-घेणे नाही. पण मध्यमवर्गीय मात्र अजूनही त्यांच्या मागे धावत असतो. आमदार खासदारांची संपत्ती ५ वर्षांत १००० पट कशी वाढते? त्यांच्याच कुटुंबातील लोक मोठ्या पदांवर कसे विराजमान होतात? रुपया घसरतोय, सरकारी संपत्ती विकली जातेय, तरी सरकारला प्रश्न विचारायची हिंमत मध्यम वर्गात का नाही? मध्यमवर्गीयांनी आता तरी डोळे उघडावेत! शेतकरी, कामगार हे प्रश्न विचारणार नाहीत. त्यांची रोजीरोटीच एवढी मोठी समस्या आहे की ते संघर्ष करण्यातच हरवून जातात. मग व्यवस्थेला जाब विचारणार कोण? विरोधाशिवाय लोकशाही टिकत नाही. आज सरकार बेलगाम घोड्यासारखं वागतंय, कारण त्याला लगाम घालणारा मध्यम वर्ग पळपुटा आणि बेजबाबदार झाला आहे. “माझं घर, पगार, गाडी सुरक्षित आहे, बाकी मला काही फरक पडत नाही!”ही मानसिकता असली तर उद्या तुमच्या पुढच्या पिढीच्या हातात काहीही उरणार नाही. देशभक्तीची खोटी बढाई थांबवा, प्रश्न विचारायला शिका! “सरकारच्या चुकीच्या निर्णयांविरोधात बोलण्याची हिंमत नसेल, तर स्वतःला देशभक्त म्हणू नका!” मध्यम वर्ग आज “माझं काय जातंय?” या मानसिकतेने गप्प बसला आहे. पण उद्या त्याची नोकरी राहील की नाही, हे तो आजही खात्रीने सांगू शकत नाही! एक विचार… दररोज कामावर जाणाऱ्या एका मध्यमवर्गीय माणसाला बस कंडक्टर, चहावाला, किराणा दुकानदार, दूधवाला, रिक्षावाला हेच भेटतात. त्याच्या व्यवहारात हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, दलित, सवर्ण याचा काहीही संबंध नसतो. मग धर्म आणि जातीच्या नावावर राजकारणी लोकांना मूर्ख का बनवतात? तुम्ही ज्या सहनशक्तीने मंदिराच्या रांगेत उभे राहता, त्याच सहनशक्तीने सरकारला प्रश्न विचारा! नाहीतर पुढच्या पिढीला अंधारात ढकलण्याची जबाबदारी फक्त तुमची असेल.
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page