Friday, April 17, 2026
Google search engine

चंद्रपूर मनपा : गटबाजीच्या राजकारणात विकास बळी का?

चंद्रपूर मनपा : गटबाजीच्या राजकारणात विकास बळी का?

nilesh thakre
8668935154

चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या जी स्थिती निर्माण झाली आहे, ती पाहता “विकास” हा शब्द फक्त भाषणांपुरता उरला की काय, असा सवाल सर्वसामान्य चंद्रपूरकरांच्या मनात उभा राहू लागला आहे. सत्ताधारी असो वा विरोधक—दोन्ही प्रमुख पक्षांत उघडपणे दिसणारी अंतर्गत गटबाजी, आरोप-प्रत्यारोप, आणि सत्तेसाठी चाललेली रस्सीखेच यामुळे शहराच्या विकासाचा गाडा रुळावरून घसरतो आहे का, याची चर्चा चौकाचौकात रंगू लागली आहे.
या निवडणुकीत जनतेने स्पष्ट संदेश दिला होता—परिवर्तनाचा! मागील सत्ताधाऱ्यांना बहुमतापासून दूर ठेवत जनतेने सत्ता बदलाची तयारी दाखवली. पण बहुमताच्या उंबरठ्यावर येऊनही सत्ता स्थापन करता न आलेल्या पक्षाची प्रतिमा जनतेच्या नजरेत धुळीस मिळाली. राजकीय गणितात चुकलेली बेरीज-वजाबाकी आणि स्वार्थी समीकरणांनी “जनादेश” हा शब्दच पायदळी तुडवला गेला, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

भाजप–काँग्रेस : दोन पक्ष, पण अनेक गट.

चंद्रपूर मनपातील दोन्ही प्रमुख पक्ष—भारतीय जनता पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस—यांच्यातील अंतर्गत वाद आता उघड गुपित राहिलेले नाहीत. सत्ताधारी पक्षात दोन गट, विरोधकांत दोन गट—आणि प्रत्येक गट स्वतःला अधिकृत ठरवण्याच्या स्पर्धेत गुंतलेला. अशा परिस्थितीत विकासाचे प्रश्न मागे पडणार नाहीत तरच नवल.
प्रश्न असा आहे की, नागरिकांनी दिलेला कौल हा शहरासाठी होता की गटबाजीसाठी? जर सत्ताधारीच आपापसांत समन्वय साधू शकत नसतील, तर प्रशासनावर त्यांची पकड कितपत परिणामकारक राहील? आणि विरोधकांनीही विधायक भूमिकेऐवजी अंतर्गत राजकारणातच ऊर्जा खर्च केली, तर लोकशाहीचा समतोल कोण राखणार?

वंचितचे उमेदवार अनुपस्थित, जनतेचा संताप.

महापौर निवडणुकीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे दोन उमेदवार अनुपस्थित राहिल्याने राजकीय समीकरणे अचानक बदलली. या अनुपस्थितीमुळे निर्माण झालेल्या संभ्रमाने आणि संतापाने जनतेचा विश्वास डळमळीत झाला आहे. “ज्यांना निवडून दिले, तेच निर्णायक क्षणी दिसले नाहीत,” अशी भावना प्रभागातील मतदार उघडपणे व्यक्त करत आहेत.
पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न झाला, पण शंकेची सावली दूर झाली नाही. राजकारणात पारदर्शकता नसेल, तर अफवा आणि संशय यांनाच खतपाणी मिळते—हे इथे पुन्हा सिद्ध झाले.

‘किंगमेकर’ची भूमिका आणि उलटलेले समीकरण.

निवडणुकीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडे ‘किंगमेकर’ म्हणून पाहिले जात होते. पण महापौर निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेमुळे आणि भाजपला दिलेल्या पाठिंब्यामुळे जिल्हाध्यक्षांवर आरोपांची सरबत्ती सुरू झाली. समर्थक गोंधळले, कार्यकर्ते संभ्रमात पडले, आणि मतदारांमध्ये अस्वस्थता वाढली.
राजकारणात भूमिका बदलणे नवे नाही; पण त्या भूमिकेला विचारसरणीचा आधार नसेल, तर ती संधीसाधूपणाची छाप घेऊन येते. आज चंद्रपूरमध्ये नेमकी हीच भावना वाढीस लागलेली दिसते. “विचारधारा की सत्ताधारा?”—हा प्रश्न मतदार सर्रास विचारू लागले आहेत.

विकासाचा प्रश्न दुय्यम?

मनपाच्या पातळीवर पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, मालमत्ता कर, कचरा व्यवस्थापन अशा मूलभूत प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित असते. पण सध्या चर्चेचा केंद्रबिंदू विकास नसून, कोणत्या गटाने कुणाला साथ दिली आणि कुणाला दगा दिला, हा झाला आहे. नागरिकांच्या दैनंदिन अडचणींवर ठोस निर्णय घेण्याऐवजी राजकीय नेते आपापल्या खुर्च्या सुरक्षित करण्याच्या प्रयत्नात व्यस्त असल्याचे चित्र आहे.
जनतेने सत्ता बदल घडवून आणताना स्पष्ट संदेश दिला होता—“आता काम हवे!” पण जर सत्तेची गणिते आणि अंतर्गत कलह यांतच वेळ गेला, तर पाच वर्षे डोळ्यांत तेल घालून बसलेल्या चंद्रपूरकरांच्या अपेक्षांचे काय?

जनतेचा रोष आणि मलिन होत चाललेली प्रतिमा.

आज परिस्थिती अशी आहे की, दोन्ही बाजूंतील नेत्यांना सार्वजनिक ठिकाणी उघडपणे धारेवर धरले जात आहे. सोशल मीडियापासून चहाच्या टपऱ्यांपर्यंत एकच चर्चा—“हीच का परिवर्तनाची राजकारण?” अनेक वर्षांची राजकीय कारकीर्द असलेल्या नेत्यांची प्रतिमा अंतर्गत वादामुळे मलिन होत चालली आहे.
नेतृत्व म्हणजे केवळ सत्तेचा उपभोग नव्हे; तर समन्वय, दूरदृष्टी आणि जनतेसमोर उत्तरदायित्वही असते. पण सध्या जे दिसते आहे, ते या तिन्ही गोष्टींपासून दूर गेलेले चित्र आहे. मतदारांचा विश्वास गमावणे सोपे; परत मिळवणे कठीण—हे वास्तव नेत्यांनी ओळखणे गरजेचे आहे.

पुढील निवडणुकीची चाहूल.

राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे की, पुढील निवडणुकीत मतदार दोन तोंडी भूमिका घेणाऱ्या नेत्यांना धडा शिकवतील. जनतेची स्मरणशक्ती अल्प असते, असे मानले जाते; पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिक रोजच्या अनुभवावर मतदान करतात. जर पाच वर्षे गटबाजी आणि सत्तास्पर्धेत गेली, तर त्याचा फटका थेट मतपेटीत बसू शकतो.

चंद्रपूरकर आता अधिक सजग झाले आहेत. सोशल मीडियाच्या युगात प्रत्येक हालचाल नोंदवली जाते, प्रत्येक विधान तपासले जाते. अशा वेळी पारदर्शकता आणि सातत्यपूर्ण भूमिका हाच एकमेव मार्ग आहे.
संपादकीय भूमिका : राजकारण नव्हे, शहर महत्त्वाचे
या सर्व घडामोडींमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे—चंद्रपूरचा विकास. शहराची वाढती लोकसंख्या, औद्योगिक शक्यता, पर्यावरणीय प्रश्न, रोजगाराच्या संधी—या सर्वांवर एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही गटबाजी बाजूला ठेवून किमान विकासाच्या मुद्द्यांवर एकत्र येणे गरजेचे आहे.

जनादेशाचा आदर करणे म्हणजे फक्त सत्ता मिळवणे नव्हे; तर जबाबदारी पार पाडणे होय. जर दोन्ही प्रमुख पक्षांनी आत्मपरीक्षण केले नाही, तर “विकास खुंटला” ही भावना केवळ चर्चा राहणार नाही—ती वास्तवात उतरेल.
चंद्रपूर महानगरपालिकेतील सध्याचे राजकारण हा एक इशारा आहे. नेत्यांनी वेळेत शहाणपण दाखवले, तर अजूनही परिस्थिती सावरू शकते. अन्यथा, पुढील निवडणूक ही केवळ सत्ता बदलणारी नव्हे, तर अनेक राजकीय कारकिर्दींना पूर्णविराम देणारी ठरू शकते.
चंद्रपूरकरांचा प्रश्न साधा आहे—“आम्हाला गटबाजी नको, विकास हवा!”
आता निर्णय नेत्यांच्या हातात आहे—इतिहास घडवायचा की इतिहासजमा व्हायचे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page