Friday, April 17, 2026
Google search engine

चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक : काँग्रेसमधील ‘इनसाईड मॅनेजमेंट’चा आरोप,

चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक : काँग्रेसमधील ‘इनसाईड मॅनेजमेंट’चा आरोप, तिकीट वाटपावर तीव्र वाद – VJNT सेलसह निष्ठावान कार्यकर्त्यांचा उद्रेक

चंद्रपूर | प्रतिनिधी
चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या अधिकृत उमेदवार यादीमुळे पक्षात मोठा वादळ उठले आहे. तिकीट वाटपात पारदर्शकतेचा अभाव, निष्ठावान कार्यकर्त्यांची गळचेपी, समाजाधारित राजकीय गणित आणि आर्थिक ‘सेटिंग’चे गंभीर आरोप होत असून, या सर्व प्रकरणांचे केंद्रबिंदू खासदार प्रतीभा धानोरकर असल्याचा आरोप पक्षातीलच इच्छुक व कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. परिणामी काँग्रेसमधील असंतोष आता उघडपणे रस्त्यावर आला आहे.

नगीनाबाग प्रभाग क्र. ९ : स्थानिक कार्यकर्ते बाजूला, ‘कौटुंबिक’ उमेदवारी पुढे?

नगीनाबाग प्रभाग क्रमांक ९ मध्ये काँग्रेस पक्षात सक्रिय नसलेले, संघटनात्मक कामाचा ठोस अनुभव नसलेले सुरेंद्र अडबायले यांना उमेदवारी देण्यात आल्याने सर्वाधिक संताप व्यक्त केला जात आहे. सुरेंद्र अडबायले हे आमदार सुधाकर अडबायले यांचे बंधू असून, वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणारे स्थानिक कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार पूर्णपणे डावलण्यात आल्याचा आरोप आहे.
“पक्षासाठी राबणाऱ्यांना बाजूला सारून नातेवाईक आणि समाजगणित पाहून उमेदवारी दिली गेली का?” असा थेट सवाल काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.

कुनबी समाजाचे राजकारण : ‘सेफ गेम’ खेळल्याचा आरोप.

याच प्रभागात भाजपकडून राहुल पावडे हेही कुनबी समाजाचे उमेदवार असल्याने, दोन्ही बाजूंनी एकाच समाजाचे उमेदवार उभे करून ‘कोण जिंकेल तरी आपल्या वर्तुळातीलच जिंकेल’ असा डाव रचल्याचा आरोप होत आहे. आमदार सुधाकर अडबायले आणि खासदार प्रतीभा धानोरकर यांनी मिळून हा ‘सेफ गेम’ खेळल्याचा गंभीर आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

१ कोटींच्या पार्टी फंडचा आरोप : बाहेरून आलेल्यांना प्राधान्य?

तिकीट वाटपावरील आरोप इथेच थांबत नाहीत. महानगरपालिकेतील इतर काही प्रभागांमध्ये भाजपमधून आलेले किंवा नुकतेच काँग्रेसमध्ये दाखल झालेले उमेदवार –
राहुल घोटेकर, स्वप्निल कांबळे, दिक्षा सातपुते – यांना मोठ्या आर्थिक व्यवहारातून उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. एकूण सुमारे १ कोटी रुपयांचा पार्टी फंड गोळा केल्याशिवाय तिकीट मिळाले नसल्याचा आरोप डावललेल्या इच्छुकांकडून होत आहे.

“जर हे आरोप खोटे असतील, तर खासदार धानोरकर यांनी खुली चौकशी आणि स्पष्टीकरण द्यावे,” अशी मागणी जोर धरत आहे.

‘सोहेल शेख’ – पडद्यामागचा सूत्रधार?

या संपूर्ण तिकीट वाटप प्रक्रियेमागे खासदार प्रतीभा धानोरकर यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सोहेल शेख हेच सूत्रधार असल्याचा आरोपही होत आहे. तिकीट वाटप, बाहेरून आलेल्यांचे व्यवस्थापन, आर्थिक देवाणघेवाण आणि स्थानिक नेतृत्वाला डावलणे – या सगळ्या बाबी एका अपक्ष, अनधिकृत आणि संघटनाबाह्य व्यक्तीकडे कशा सोपवण्यात आल्या? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विजयी आणि निष्ठावान चेहरे डावलले.

चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसला सातत्याने यश मिळवून देणारे अनेक अनुभवी चेहरे यावेळी डावलण्यात आल्याचा आरोप आहे. त्यात
बापू अन्सारी, सकीना अन्सारी, नंदू नागरकर, प्रशांत दानव, विना खनके यांचा समावेश आहे.
तसेच अनुसूचित विभागाचे शहराध्यक्ष सागर खोबरागडे यांना डावलून ऐकोरी प्रभागातून स्थानिक नसलेल्या राहुल घोटेकर यांना उमेदवारी देण्यात आल्याने नाराजी आणखी वाढली आहे.

पी.ए.च्या पत्नीला उमेदवारी : घराणेशाहीचा आरोप.

आणखी एक खळबळजनक आरोप म्हणजे खासदार धानोरकर यांच्या पी.ए. यांच्या पत्नीला थेट उमेदवारी देण्यात आल्याचा. “घरचे आधी आणि पक्ष नंतर” या भूमिकेमुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. “असं असेल तर पक्षासाठी जीव तोडून काम करायचे तरी का?” असा प्रश्न कार्यकर्ते विचारत आहेत.

VJNT सेलचा संताप : एकाही उमेदवाराला संधी नाही.

तिकीट वाटपात भटक्या विमुक्त जाती-जमाती (VJNT) सेल ला पूर्णतः डावलण्यात आल्याने या सेलमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. चंद्रपूर शहरात VJNT सेलचे अनेक सक्रिय पदाधिकारी असूनही एकाही इच्छुकाला उमेदवारी देण्यात आलेली नाही.
VJNT सेलचे प्रदेश संघटक अवधुत कोटेवार, शहराध्यक्ष विजय पोहनकर यांच्यासह अनेकांनी काँग्रेससाठी लोकसभा-विधानसभा निवडणुकांत सक्रिय काम केले आहे. कन्नमवार जयंतीसारखे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित करून पक्षाला मान मिळवून दिला. तरीही केवळ “लोभापोटी” VJNT सेलला डावलल्याचा आरोप करण्यात येत आहे.

पत्राचीही दखल नाही.

VJNT सेलच्या प्रदेशाध्यक्षा सौ. पल्लवीताई रेनके यांच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठींना तीन उमेदवारांना तिकीट देण्याची मागणी करणारे पत्र पाठवण्यात आले होते. मात्र त्याची कोणतीही दखल काँग्रेस नेतृत्वाने घेतली नाही, असा आरोप आहे.
कार्यकर्त्यांचा सवाल : काँग्रेस कुणाची?
या सर्व घडामोडींमुळे काँग्रेस पक्षातील असंतोष शिगेला पोहोचला आहे.

“काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांचा आहे की मोजक्या लोकांचा?विचारधारेचा आहे की पैशाचा?
संघर्ष करणाऱ्यांचा आहे की ‘इनसाईड मॅनेजमेंट’चा?”
असे प्रश्न आता उघडपणे विचारले जात आहेत.
मागण्या चंद्रपूर महानगरपालिका तिकीट वाटपाची स्वतंत्र चौकशी व्हावी
बाहेरून आलेल्या उमेदवारांची पक्षनिष्ठा व आर्थिक व्यवहार तपासले जावेत डावललेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय मिळावा खासदार प्रतीभा धानोरकर यांनी खुली भूमिका व स्पष्टीकरण द्यावे
“आज काँग्रेस वाचवायची असेल, तर अशा स्वार्थी आणि समाज फोडणाऱ्या राजकारणाला आळा घालावा लागेल. अन्यथा काँग्रेसचा पराभव विरोधकांमुळे नाही, तर आपल्या आतल्या कारस्थानांमुळेच होईल,” अशी भीती काँग्रेस इच्छुक उमेदवार रतन रामसागर शिल्लावार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page