
घुग्घुस शहरातील समस्या सोडविण्यासाठी काँग्रेसचा पुढाकार: शहर काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी
यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
कल्याण सोदारी घुग्घुस तालुका प्रतिनिधी
घुग्घूस: शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगरपरिषद मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांच्याशी बैठक घेतली. यावेळी शहरातील रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा, पथदिवे, पार्किंग, स्वच्छता व इतर समस्या तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली.
राजुरेड्डी यांनी सांगितले की, शहरातील नागरिक विविध समस्यांमुळे त्रस्त असून नगरपरिषद दुर्लक्ष करत आहे. जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. बैठकीत खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली:
- पार्किंग व्यवस्था: आठवडी बाजारात पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी.
- रस्त्यांची दुरुस्ती: साईनगरकडे जाणाऱ्या वळण रस्त्यांवर मुरूम टाकण्यात यावा.
- खड्ड्यांची भरपाई: केबल टाकण्याच्या कामामुळे खोदलेले खड्डे तातडीने भरावेत.
- स्वच्छता: रस्त्याच्या बाजूला असलेल्या कचऱ्याची व जंगली झाडांची सफाई करण्यात यावी.
- पाणीपुरवठा: वॉर्ड क्र. 6 येथील फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करून संपूर्ण पाईपलाईन तपासावी.
- नाल्यांची दुरुस्ती: तुटलेल्या नाल्यांची दुरुस्ती व नवीन नाल्यांची निर्मिती करावी.
- पथदिवे: बंद अवस्थेतील पथदिवे चालू करण्यात यावेत.
- कचराकुंड्या: स्वच्छता व देखभाल करावी.
- शौचालये व वाचनालये: बंद शौचालये व वाचनालये सुरू करावीत.
- अंगणवाडी दुरुस्ती: अंगणवाडी व बोरिंगची स्वच्छता आणि दुरुस्ती करण्यात यावी.
- बाल उद्याने: बाल उद्यानांची चौकशी करून दुरुस्ती करण्यात यावी.
- जंतूनाशक फवारणी: डास व रोगराई कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
- ग्रामीण रुग्णालय: रुग्णालयाजवळील रस्ता व नाल्यांची त्वरित दुरुस्ती करावी.
मुख्याधिकाऱ्यांनी सर्व मागण्या शांतपणे ऐकून घेतल्या व त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. राजुरेड्डी यांनी यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याची तयारी दर्शविली आहे.



