
शिव मंदिराच्या शांततेसाठी पुढाकार – घुग्घुसमधील नागरिकांची तक्रार प्रशासनाच्या निदर्शनास
कल्याण सोदारी प्रतिनिधी, चंद्रपूर तालुका
घुग्घुस, दि. ७ मार्च २०२५ – घुग्घुस येथील पुरातन शिव मंदिराच्या पवित्र परिसरात निर्माण झालेल्या अडचणींबाबत स्थानिक नागरिकांनी एकत्र येत, प्रशासनाकडे गंभीर तक्रार दाखल केली आहे. देशी दारू दुकानाच्या नियमबाह्य वर्तनामुळे मंदिर परिसरात भक्तांना त्रास होत असल्याने श्री. सुधाकर गणपत बांदुरकर (माजी उपसरपंच, ग्रा.पं. घुग्घुस) यांनी उत्पादन शुल्क विभागाकडे लेखी निवेदन सादर केले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, “मे कॅप्टन दीक्षित कंट्री लिकर शॉप” का.न.सी.एल.९६/२०२३ते२०२४
या देशी दारू दुकानाचे मालक शासनाने मंजूर केलेल्या नकाशा व मार्गाऐवजी मंदिरासमोरील रस्त्याचा वापर करत आहेत. त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या महिला व भाविक भक्तांना मानसिक त्रास होत असून, परिसरात असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे.
दरम्यान, दारू पिऊन मंदिर परिसरात हुज्जत घालणाऱ्यांमुळे महिला भक्तांना अनेकदा अपमानास्पद आणि त्रासदायक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मंदिराच्या पवित्रतेला धक्का पोहोचत असून, परिसरात अस्वस्थता निर्माण होत आहे.
शिवमंदिरासमोरील व बाजूच्या रस्त्याचा गैरवापर थांबवून, देशी दारू दुकानावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. ही तक्रार जिल्हाधिकारी, नगरपरिषद कार्यालय आणि स्थानिक आमदार यांना प्रत पाठवून पुढाकार घेण्यात आला आहे.
स्थानिक नागरिकांना आशा आहे की, प्रशासन लवकरच यावर योग्य ती कारवाई करेल आणि मंदिर परिसरात शांतता व सुरक्षिततेचं वातावरण पुन्हा प्रस्थापित होईल



