
घुग्घूस शहरात स्मार्ट मीटर बसविण्याला विरोध, काँग्रेसने दिले निवेदन
कल्याण सोदारी प्रतिनिधी चंद्रपूर तालुका प्रतीनीधी
घुग्घूस : महावितरणकडून शहरातील वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात येत असल्याच्या तक्रारी काँग्रेस कार्यालयात आल्यामुळे, काँग्रेस शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महावितरणच्या मुख्य अभियंता भटारकर यांची भेट घेतली आणि या संदर्भात निवेदन दिले.
काँग्रेसने निवेदनाद्वारे याचा निषेध व्यक्त करताना म्हटले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बसवले जाणार नाही असे जाहीर केले होते. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात महावितरणने सरकारी कार्यालयांपासून सुरूवात करून, नंतर खराब झालेल्या वीज मीटरऐवजी स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
स्मार्ट मीटरमुळे आर्थिक संकटाचा धोका
स्मार्ट मीटरचा वापर नागरिकांसाठी आर्थिक दृष्टिकोनातून परवडणारा नसल्याचे काँग्रेसने सांगितले. चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा असून, येथे ठेकेदारी कामगार, शेतमजूर आणि छोटे व्यापारी मोठ्या प्रमाणावर आहेत. कामगारांना वेळेवर वेतन मिळत नाही, त्यामुळे स्मार्ट मीटरमुळे रिचार्जचा बोजा त्यांच्यावर येईल. काँग्रेसने याला षडयंत्र म्हणत, स्मार्ट मीटरचा वापर नागरिकांना आर्थिक अडचणीत आणणारा निर्णय असल्याचा आरोप केला.
शिष्टमंडळातील मान्यवरांची उपस्थिती
या शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचे अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये सैय्यद अनवर, लक्ष्मण सदलावार, अलीम शेख, रोशन दंतलवार, यास्मिन सैय्यद, पदमा त्रिवेणी, संगीता बोबडे, दुर्गा पाटील, मंगला बुरांडे, शेखर तंगडपल्ली, दिपक पेंदोर, कुमार रूद्रारप, सुनील पाटील, रोहित डाकुर, दिपक कांबळे,सतीश आटे,आयूष आवळे,पपीत वासेकर,मीना श्रीवास्तव, अनिता जुनगरी,निशा शेख, वर्षा पाटील चंदा दुर्गॆ, नंदा आत्राम ,यांच्या आणि इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
मुख्य मागणी
घुग्घूस शहर आणि चंद्रपूर जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी काँग्रेसच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. स्मार्ट मीटरचा निर्णय नागरिकांच्या हिताविरोधी असल्याचा ठाम पवित्रा काँग्रेसने घेतला आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी यावर लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.



