Saturday, April 18, 2026
Google search engine

कार्यकर्ता

कार्यकर्ता


कोणतीही चळवळ कार्यकर्त्यांच्या बळावरच यशस्वी होते. तोच चळवळीचा प्राण आणि आत्मा असतो. मात्र मागील काही वर्षात ‘कार्यकर्ता’ म्हणजे पुढा-यांच्या तालावर नाचणारे खेळणे बनले आहे.

कार्यकर्ता कोणत्याही मोर्चे, आंदोलनात ज्या दिशेने वा-याची झुळुक येईल, त्या दिशेने कार्यकर्तेही धावत सुटत आहेत. त्यासाठी ‘मी समाजाचा काही तरी देणेकरी लागतो’ ही भावना आहे. एक वेळ माझ्या घरात चूल पेटत नसली तरी दुस-याच्या घरात आज काही शिजलं की नाही, याची काळजी वाहणारा खरा पुढारी म्हणजेच कार्यकर्ता. अपार दु:ख, कष्ट, वेदना आणि अनेकांचे टोमणे सहन करून चळवळीसाठी दिवसरात्र खपायचे. दलित, पीडित, निराधारांवर होणा-या अन्यायाविरोधात समाजाला जागे करण्यासाठी संघर्ष करायचा. फुले-शाहू-आंबेडकरांची मायभूमी असलेल्या महाराष्ट्राला संयुक्त महाराष्ट्राचा लढा, स्वातंत्र्यासाठीची लढाई, शेतक-यांची, कष्टक-यांची, कामगारांची आंदोलने असा लढवय्या इतिहास आहे.

आजघडीला मुंबईचे शिवाजी पार्क, आझाद मैदान, परळचे कामगार मैदान, वरळीचे जांबोरी मैदान, प्रखर आंदोलनाविना उघडेबोडके पडले आहे. पण, झोपडी-चाळीतून पुढे आलेली आणि कायम रस्त्यावरच्या लढाईसाठी सज्ज असलेली रिपब्लिकन चळवळ आजही काही नि:स्वार्थी कार्यकर्त्यांच्या बळावर तग धरून आहे. गटातटांत विखुरलेली ही चळवळ बाबासाहेब आंबेडकर हा एकच आई आणि बाप मानणारी आहे. कोणत्याही अन्याय-अत्याचाराविरोधात एकत्र पुकारा करणा-या या चळवळीची ताकद ‘कार्यकर्ता’ हीच आहे. रमाबाई आंबेडकरनगर हत्याकांड, मराठवाडा विद्यापीठ नामांतर, वरळीची दंगल, रिडल्सचं आंदोलन अशा अनेक बाक्या प्रसंगात आंबेडकरी समाजाच्या एकोप्याचे दर्शन घडण्यामागे कार्यकर्त्यांची त्यागी आणि नि:स्वार्थी वृत्तीच आहे. मात्र गेल्या काही वर्षात तो अमक्यासोबत, तो तमक्यासोबत असे कार्यकर्त्यांना दावणीला बांधण्याचे उद्योग जोरात सुरू झाल्याने गटबाजीने पोखरलेला कार्यकर्ता दोन्ही मांडवांचा जावई झाल्याचे दु:ख उरात बाळगून आहे. चळवळीसाठी रात्रंदिन खपताना शिक्षण, संसार आणि नोकरीला मूठमाती देणारे अनेक कार्यकर्ते आहेत. नव्या आणि जुन्या फळीतील या कार्यकर्त्यांच्या मनाचा ठाव कुणालाच घेता येणार नाही. हातात धरलेल्या झेंडय़ाच्या लाठीचा मार खाऊनही त्याचे नाव कुठेच नाही.

पद आणि साहेबांचा कार्यकर्ता हीच त्याच्यासाठी मोठी प्रतिष्ठा. पण, बाबासाहेबांचा स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुतेचा विचार जिवंत ठेवण्यासाठी शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढणार, हीच भावना घेऊन रिपब्लिकन चळवळ अस्तित्व टिकवून आहे. झेंडा एक, विचार एक पण गट अनेक. हेच सामाजिक दु:ख घेऊन नेता ज्या मांडवात, कार्यकर्ताही त्याच मांडवात अशी कार्यकर्त्यांची फरफट सुरू आहे.

पँथर, नामांतर आणि रिडल्सपासून साहेबांच्या खांद्याला खांदा लावून दगड, लाठय़ा खाणारा रामकिसन आजही गोवंडीतील दहाबाय दहाच्या झोपडीतच खूश आहे. निवडणूक आल्यावर कॉलर टाइट करून वावरणारा रामकिसन सिद्धार्थ कॉलेजात असल्यापासून नेतेगिरीत. त्याच्या घरची परिस्थिती बेताचीच. वडिलांचं छत्र लहानपणीच हरवल्यानं दोन बहिणी आणि धाकटय़ा रामकिसनला आईने भाजीच्या धंद्यावर कसाबसा वाढवला. तिच्या कष्टाचं चीज म्हणून रामकिसन शिकून सवरून खूप मोठा होईल, पैसाअडका कमावेल अशी तिची अपेक्षा. पण, बाबासाहेबांच्या विचारांनी भारलेला आणि कायम दुस-यांच्या मदतीसाठी धावणा-या रामकिसनने आपल्या झोळीत काय आणि किती पडेल, याचा विचार कधीही केला नाही. कार्यकर्ता आणि नेतेगिरीचं त्याच्या मानगुटीवर बसलेलं भूत उतरवण्यासाठी आईने त्याला हळदीपाण्यातूनही काढलं. पण, लग्नानंतर तो बदलेल असं वाटत असताना त्याच्यातील कार्यकर्त्यांने त्याला स्वस्थ बसू दिले नाही. बायको, मुले असे कुटुंब वाढल्यानंतरही पदरमोड करून चळवळीसाठी, समाजासाठी काही तरी करण्याची त्याची धडपड सुरू आहे.

१९७२-७४ च्या सुमारास गटातटांत विखुरलेल्या रिपब्लिकन पुढा-यांना एकाच तंबूत आणण्यासाठी सळो की पळो करून सोडणारी पँथर म्हणजे बेडर आणि नि:स्वार्थी कार्यकर्त्यांचा झोतच होता. मात्र नेत्यांमधील अंतर्गत दुहीमुळे अवघ्या दोन वर्षातच पँथर इतिहासजमा झाली. दलितांवर होणा-या अन्याय, अत्याचाराविरोधात भीषण युद्ध करू पाहणारा ‘पँथर’चा अंगार विझल्याने लाखो कार्यकर्त्यांची निराशा झाली. ज्या नेत्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी ही चळवळ संपवली त्या नेत्यांना कार्यकर्ता एकत्र आणू शकला नाही. उलट याच नेत्यांवर विश्वास टाकून तो चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आजही खपत आहे. समाजाच्या भल्यासाठी स्वत:चे आयुष्य पणाला लावणा-या सच्चा कार्यकर्त्यांला गटातटांच्या तंबूत आपला वापर होत असल्याचे कधीच लक्षात आले आहे. पण, बाबासाहेबांच्या विचारांची ज्योत तेवत ठेवण्यासाठी त्याने स्वार्थाला मूठमाती दिली आहे. एकीकडे सोन्या-नाण्याने मढलेला नोटवाला कार्यकर्ता तर दुसरीकडे चळवळीचे पुढे काय होईल, या चिंतेचे ओझे घेऊन वाहणारा रामकिसनसारखा कार्यकर्ता ‘कुटिया मेरी भली है’, म्हणत आपल्याच झोपडीत समाधानी आहे. कष्टाळू, मेहनती आणि पहाडी आवाजात वस्त्यावस्त्यांत विद्रोहाचा अग्नी पेटवणारा, स्वत:ला विज्ञाननिष्ठ आणि लोकशाहीवादी म्हणवणारा, भारतीय समाजाला स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या त्रयींवर उभा करणारा कार्यकर्ता आंबेडकरी चळवळीतील नेत्यांसमोर एवढा मुका का होतो, त्याला चळवळीत सत्ता मिळत नाही, मान नाही, बहुमान नाही, प्रतिष्ठा नाही, स्वकीयांपासून परकीयांपर्यंत त्याच्या पदरात अपमान आणि तिरस्कार पडतो. मात्र चळवळीचा आत्मा असलेल्या या कार्यकर्त्यांचे दु:ख वेशीवर कोण टांगणार, याचे उत्तर आज सापडत नाही.

आजचा कार्यकर्ता उद्योगी आणि बदललेला असला तरी वैयक्तिक तत्त्वांची ठाम बैठक असलेल्या सर्वच कार्यकर्त्यांना संधीसाधूपणा जमलेला नाही. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मुरलीधर जाधव यांच्या ‘कार्यकर्ता’ या कादंबरीतील सदा या नायकाप्रमाणे तो आजही अंधारात चाचपडत आहे.

‘‘तू त्याच्याकडे पैसे मागायला नको होते.’’. ‘‘मलाही कळतं रे माधव, त्याच्याकडे पैसे मागायला नको. पण, दिवसभर समाजाची कामे करून घरी जायला निघालो की रस्त्यावरचे सगळे भले भले दिवे विझल्यासारखे वाटतात. प्रचंड काळोख, राक्षसी रूप घेऊन मी चालत असलेल्या रस्त्याच्या उरावर प्रचंड शिला होऊन बसलेला असतो. डोकं सुन्न होतं. शरीराला ओढत नेणारे माझे पाय कुणी तरी साखळदंडाने ओढतंय असं वाटतं. तसाच मी स्वत:ला त्या भयावह अंधारातून ओढून घराच्या दिशेने नेत असतो. मन घराकडे स्वैरपणे धाव घेतं. पण शरीर जड पडतं.’’ सदा निराश होऊन माधवशी बोलत होता. दु:ख, निराशा, दारिद्रय़ आणि उद्वेगाने भरलेले सदासारख्या कार्यकर्त्यांचे हे जीवन. उपेक्षेचे डंखे सोसणारा हा कार्यकर्ता त्यानंतरही आभाळाएवढे दु:ख उपसतो. त्याच्या खांद्यावर उभे राहून त्याचे नेते सत्तेचं राजकारण करतात. संकटं येतात. कार्यकर्ता पिचून जातो. आपल्याच हाती असलेल्या झेंडय़ाच्या काठीचा मार त्याला बसतो. त्यानंतरही बाबासाहेब नावाचे ‘स्पिरिट’ सदासारख्या कार्यकर्त्यांला नवीन संघर्षासाठी बळ देते. सदासारखे दलितांमधील तरुण कार्यकर्ते आजही अनेक अडचणींचा डोंगर पार करून पुन्हा नव्या जोमाने समाजकार्यासाठी झटत आहेत. या सर्वाना निळा सलाम.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page